"दहिसर टोल नाका हलवण्याची मागणी – वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रताप सरनाईक यांचा पुढाकार"

मुंबई (१२ ऑगस्ट २०२५) – मीरा-भाईंदर शहराच्या सीमारेषेवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीला अखेर आवाज मिळाला आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोल नाका हलवण्याची मागणी करत, तो वेस्टर्न हॉटेलजवळ स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित केले आहे.
सरनाईक यांनी ही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अधिकृत निवेदनाद्वारे सादर केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, टोल नाका सध्या शहराच्या आत असून, त्यामुळे दररोज लाखो नागरिक आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. परिणामी इंधनाचा अनावश्यक अपव्यय होतो, तसेच प्रदूषणाचे प्रमाणही वाढते.
सरनाईक यांनी नमूद केले की, "मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी अनेक टोल नाके रद्द केले आणि लहान वाहनांसाठी टोलमाफी जाहीर केली. त्याच धर्तीवर दहिसर टोल नाका शहराच्या बाहेर हलवला गेला पाहिजे. वेस्टर्न हॉटेलजवळ तो स्थलांतरित झाल्यास प्रवास अधिक सुलभ होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल."
ते पुढे म्हणाले की, "मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेला हा टोल नाका स्थानिक १५ लाख रहिवाशांसाठी अडथळा ठरत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या आणि तिकडून येणाऱ्या वाहनांमुळे येथे कायमच वाहतूक ठप्प होते. या ठिकाणी टोल सुरू ठेवणं म्हणजे नागरिकांच्या वेळेची, इंधनाची आणि सहनशीलतेची परीक्षा आहे."
या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच याबाबत बैठक घेण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे दहिसर टोल नाका हलवण्याच्या दिशेने लवकरच ठोस पाऊल उचलले जाण्याची शक्यता असून, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास परिवहन मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?






