महायुती सरकारविरोधात उबाठा सेनेचे तीव्र जनआक्रोश आंदोलन
भाईंदर – राज्यातील महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत उबाठा शिवसेनेने भाईंदर येथील अप्पर तहसीलदार कार्यालयाबाहेर सोमवारी जोरदार आंदोलन छेडले. सरकारमधील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तणुकीवर संताप व्यक्त करत आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली आणि 'खोका सरकार' असा थेट आरोप केला.
आंदोलनादरम्यान सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करत त्यांच्या निषेधार्थ 'खोक्याचे दहन' करण्यात आले. आंदोलकांच्या मते, हे मंत्री जनतेची सेवा करण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी पदांचा वापर करत आहेत. यावेळी त्यांनी काही मंत्र्यांच्या वादग्रस्त कृत्यांचा संदर्भ देत संताप व्यक्त केला.
मंत्री माणिकराव कोकाटे पावसाळी अधिवेशनात रमी खेळताना व्हायरल झाले होते, तर संजय शिरसाट आमदार निवासात टॉवेलवर सिगारेट ओढताना दिसले. मंत्री योगेश कदम यांच्यावर महिलांबाबत गंभीर आरोप असल्याचे आंदोलकांनी निदर्शनात आणले.
"अशा मंत्र्यांनी लोकशाहीची थट्टा उडवली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने यांच्याकडून राजीनामे घेतले पाहिजेत," अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच या मंत्र्यांच्या जागी सुसंस्कृत, साहित्यिक आणि खऱ्या अर्थाने लोकसेवा करणाऱ्या आमदारांना संधी द्यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
आंदोलनानंतर उबाठा सेनेच्या वतीने एक निवेदन अप्पर तहसीलदार निलेश गौड यांच्याकडे सादर करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला संघटक निलम ढवण, उपजिल्हाप्रमुख बनेश पाटील, जिल्हा समन्वयक मनोज मयेकर, शहर प्रमुख प्रशांत सावंत, शाखा प्रमुख नरेंद्र उपरकर, पुर्व जिल्हा सचिव श्रेयस हडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
What's Your Reaction?






