२ ऑक्टोबर पासून 'स्वच्छ शहर मोहीम' राबवणार - प्रताप सरनाईक

Sep 23, 2024 - 16:02
 0  11
२ ऑक्टोबर पासून 'स्वच्छ शहर मोहीम' राबवणार - प्रताप सरनाईक

भाईंदर - मीरा भाईंदरसाठी २० आधुनिक टोगो वाहने मिळणार 

जनतेच्या सहभागामुळे स्वच्छ भारत - स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे रुपांतर एका राष्ट्रीय चळवळीत झाले आहे. या अभियानामुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. त्याचाच अधिक विस्तार करून ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर ही स्वच्छ शहर मोहीम २ ऑक्टोबर गांधी जयंती पासून सुरु करण्यात येणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.  मीरा भाईंदर स्वच्छ्तेसाठी २० आधुनिक टोगो वाहने दिली जाणार आहेत. या वाहनातच ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे. 
            मीरा भाईंदर शहरात नवीन आधुनिक टोगो वाहने , खत निर्मिती प्रकल्प तसेच प्रत्येक सोसायटी , इमारती , बैठ्या चाळींना ओला - सुका कचरा ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचे कचऱ्याचे डबे वाटप केले जाणार आहेत. यासाठी राज्य सरकारने १५० कोटींचा निधी दिला आहे. मीरा भाईंदर शहरात 'शून्य कचरा मोहीम' राबवून शहर स्वच्छ - सुंदर करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत.  लोकांच्या सक्रीय सहभागामुळेच स्वच्छ सुंदर मीरा भाईंदरचे हे स्वप्नही प्रत्यक्षात उतरेल याची खात्री आहे असे सरनाईक म्हणाले. मीरा भाईंदर शहर स्वच्छ , सुंदर रहावे येथील हवामानाचा दर्जा चांगला रहावा व प्रदूषणमुक्त चांगले वातावरण सदैव रहावे यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित कायमस्वरुपी स्वच्छतेसाठी स्वस्त आणि योग्य आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे हेही सध्याच्या दिवसात आवश्यक बनले आहे. यासाठी शहरात काही नवीन योजना व उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

स्वच्छ मीरा भाईंदरसाठी २० टोगो वाहने कचरा व्यवस्थापना अभावी उद्भवणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी तसेच ओल्या कचऱ्याची समस्या पूर्णतः सुटावी या दृष्टीने ओल्या कचऱ्याचे रूपांतर खतात करणारे एक आधुनिक टोगो यंत्र वाहन तयार करण्यात आले आहे. मीरा भाईंदर शहरासाठी २० टोगो व्हॅनची खरेदी करण्यात आली आहे. चालता - फिरता कचऱ्यापासून खत निर्मिती करणारे टोगो हे जगातील या प्रकारचे पहिलेच वाहन यंत्र आहे. टोगो म्हणजे ट्रीटमेंट ऑफ द वेस्ट ऑन द गो अशी ही संकल्पना आहे. कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी जागा, त्याचप्रमाणे कचऱ्यातून पसरणारी दुर्गंधी यासारख्या समस्यांवर हा एक सरळ व सोपा असा उपाय आहे. टोगो वाहन नैसर्गिक इंधनावर चालत असल्याने आणि प्रक्रियेसाठी सौर ऊर्जेचा वापर करत असल्याने टोगो ही प्रदूषण विरहित आहे. शहराच्या विविध भागात जाऊन टोगो कचरा गोळा करणार असल्याने कचऱ्याच्या ने - आण दरम्यान सांडणाऱ्या कचऱ्यातून पसरणारी घाण व दुर्गंधी होणार नाही.

  टोगो मधून निर्माण होणारे खत शहरातील उद्याने , रस्त्याच्या दुतर्फ़ा असलेली झाडे तसेच मोठ्या हौसिंग सोसायट्यांमधील उद्याने यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या एका टोगो वाहनाची क्षमता दीड टन ओल्या कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करण्याची आहे. सात दिवसात यात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत होणार असले तरी दररोज दीड टन कचरा या वाहनात प्रक्रियेसाठी टाकू शकणार आहे. याचबरोबर शहरात ४ ठिकाणी खत बनविण्याचे स्वतंत्र प्रकल्पही प्रस्तावित करण्यात आले आहेत , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow