कल्याण-डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत 24 तास मांस विक्री व कत्तलीवर बंदी राहणार आहे. महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांच्या मान्यतेने 1988 च्या प्रशासनिक ठरावाच्या आधारे ही बंदी लागू करण्यात आली आहे.
या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यांनी थेट सवाल उपस्थित करत म्हटलं, "यांच्या बापाचं राज्य आहे का लोकांनी काय खावं आणि विकावं यावर बंदी घालायला? हा काय तमाशा आहे?"
ते पुढे म्हणाले, "बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. माकडापासून माणूस झाल्यावरही दातांची रचना मांसाहारीच राहिली आहे. तुम्ही स्वातंत्र्य दिनाच्या नावाखाली आमचं खाण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहात. हे चुकीचं आहे."
आव्हाड यांनी महापालिकेवर गंभीर आरोप करत म्हटलं की, "कल्याण-डोंबिवली पालिका बहुजन समाजाच्या विरोधात काम करते आहे. मी तर ठरवलंय – त्या दिवशीच मी मटण पार्टी ठेवणार."
तसंच त्यांनी आदेश देणाऱ्या उपायुक्त कांचन गायकवाड यांच्यावरही टीका केली. "गायकवाड बाईंना कोण अधिकार देतो अशा आदेश काढायला? शासन नावाचं काही आहे की नाही? कोणताही लोकप्रतिनिधी नाही आणि एक उपायुक्त असा आदेश काढते – हे योग्य आहे का?" असा सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला.
"कल्याण-मुंबईमध्ये मांस खाऊ नये आणि श्रीखंड-पुरीच खावी, असा सरकारने कुठे आदेश दिला आहे का?" अशा शब्दांत आव्हाड यांनी पालिकेच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला.
हा मुद्दा आता राजकीय व सामाजिक पातळीवर वादाचा विषय ठरत असून, प्रशासनाचा निर्णय आणि त्यावर प्रतिक्रिया यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे.