भाईंदर – मीरा भाईंदर महानगरपालिकेत ठोक वेतन श्रेणीवर काम करणाऱ्या तीन बालवाडी शिक्षिकांना तब्बल १५ वर्षांपासून थकित असलेला भविष्य निर्वाह निधी अखेर मिळवून देण्यात यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, या लढ्यादरम्यान निवृत्तीनंतर निधन झालेल्या मंदाकिनी रूपवते या शिक्षिकेच्या कुटुंबालाही संपूर्ण रक्कम मिळवून देण्यात झुंज जनरल कामगार युनियनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
ज्योत्स्ना माची, वनिता सिंग आणि मंदाकिनी रूपवते या तीन बालवाडी शिक्षिका अनेक वर्षांपासून पालिकेत सेवेत होत्या. मात्र त्यांच्या पगारातून कपात होऊनही भविष्य निर्वाह निधी (PF) संबंधित कार्यालयात जमा केला जात नव्हता. कोणतीही तक्रार न झाल्याने प्रशासनानेही दुर्लक्ष केले. हा अन्याय लक्षात घेत झुंज जनरल कामगार युनियनने कायदेशीर लढा उभारला.
दरम्यान, मंदाकिनी रूपवते निवृत्त झाल्यानंतर भविष्य निर्वाह निधीसाठी प्रयत्न करत असतानाच त्यांचे निधन झाले. मात्र संघटनेने हा लढा थांबवला नाही. अध्यक्ष डॉ. अमित भोसले यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहिला. "कामगारांचा हक्क हिरावून घेणाऱ्या यंत्रणेला जबाबदार ठरवणे आवश्यक आहे. आम्ही हा लढा सुरूच ठेवणार," अशी भूमिका त्यांनी मांडली.
संघटनेच्या पाठपुराव्यामुळे आणि कायदेशीर कार्यवाहीमुळे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने पालिकेला दंड ठोठावला. ही महाराष्ट्रातील पहिली घटना ठरली, जिथे महापालिकेला PF नियमभंगाबद्दल अधिकृतपणे शिक्षा झाली. या निर्णयामुळे इतर पालिकांसाठीही एक महत्त्वाचा आदर्श उभा राहिला आहे.
एकूण १६ लाख रुपये वसूल करण्यात आले असून, संबंधित शिक्षिकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंदाकिनी रूपवते यांच्या वारसदारांनाही त्यांचा हक्काचा निधी मिळाला असून, त्यांचा संघर्ष व्यर्थ गेला नाही.
झुंज जनरल कामगार युनियनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला असून, त्यामुळे राज्यातील इतर ठोक वेतन कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळवण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.