पंतप्रधान मोदी हे राहुल गांधींना घाबरल्याने त्यांना बदनाम करण्यासह धमक्या - रमेश चेन्निथला

Sep 23, 2024 - 15:53
 0  11
पंतप्रधान मोदी हे राहुल गांधींना घाबरल्याने त्यांना बदनाम करण्यासह धमक्या -  रमेश चेन्निथला

मीरारोड -  देशातील गोरगरिबांच्या समस्या व मूलभूत गरजा तसेच वाढत्या महागाई विरोधात सत्तेतील भाजपा युती शब्द काढत नाहीत. राहुल गांधी जनतेचा आवाज बनल्याने त्यांना लोकांची साथ मिळत असल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल यांना घाबरले आहेत . म्हणूनच राहुल यांना बदनाम करण्याचा व त्यांना धमकावण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र पर्यवेक्षक रमेश चेन्निथला यांनी भाईंदर येथे केला . 

काँग्रेसच्या कोकण विभाग १८ जिल्हा निहाय आढावा बैठक भाईंदरच्या मॅक्सस मॉल सभागृहात गुरुवारी झाली . यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली . जात - धर्म न पाहता चांगला कार्यक्षम उमेदवार दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले .   पर्यवेक्षक रमेश चेन्निथला सह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज पाटील , विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, कार्याध्यक्ष मुझ्झफर हुसेन, भाई जगताप , माजी खासदार हुसेन दलवाई आदी तर स्थानिक मीरा भाईंदर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, महिला जिल्हाध्यक्ष रुपा पिंटो,  युवा काँग्रेसचे कुणाल काटकर व सिद्धेश राणे , प्रवक्ते प्रकाश नागणे, माजी नगरसेवक राजीव मेहरा , अनिल सावंत , जुबेर इनामदार, मर्लिन डिसा , गीता परदेशी , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुल राजकारणात आल्यापासून भाजप त्रस्त झाल्याने  त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी कोट्यावधी खर्च केले जात आहेत . राहुल यांना भाजपा युतीचे आमदार - खासदार उघड धमक्या देत असताना पंतप्रधान मोदी,  हे  गृहमंत्री अमित शहा हे काहीच बोलत नाहीत. राहुल यांची जीभ कापणाऱ्यांना ११ लाख रुपयाचे इनाम देणार असे म्हणणाऱ्या शिंदेगटाच्या आमदारावर कारवाई व्हावी . भाजप युती देशाच्या भवितव्यासाठी ठीक नाही. मात्र राहुल गांधी लोकांच्या मनात असून जनतेने भाजपचा मजबुतीने मुकाबला करण्याचा निर्धार केला असल्याचे चेन्निथला म्हणाले . 

सोयाबीन ला भाव मिळत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुलढाणा येथील शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने लिहिलेले पत्र दिले.  त्या शेतकऱ्यांवर हे सूडबुद्धी सरकार खोटे गुन्हे दाखल करत त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम करत आहे.  किती गुन्हे दाखल करून किती शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकणार ? अशा अन्नदात्यांचा विरोध करणाऱ्या सरकारला सत्तेबाहेर खेचणार असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले . संविधान संपवण्याचे काम केले जात आहे . जातीनिहाय जनगणना करण्यास टाळाटाळ होत आहे . एकीकडे महागाई वाढवून पैसे काढायचे आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना सांगून थोडीशी मदत द्यायची असा प्रकार सुरू आहे. हरियाणा व जम्मू काश्मीर येथे काँग्रेस आघाडीच आघाडीवर आहे .  भाजपा विरुद्ध काँग्रेस व जनता जेलभरो आंदोलन करणार आहे असे ते म्हणाले . 

 खुलेआम धमक्या , शिव्या देत भाजपा आमदार नितेश राणे हे धर्मात भांडणे लावण्यासाठी वरून सांगितलं त्यानुसार बोलतात . नथुराम गोडसे ची प्रवृत्ती पुन्हा राणे यांच्या रूपाने पाहायला मिळत आहे.  दंगली घडविण्याची धडपड सुरू आहे. मंत्रालय हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चरम सीमेवर आहे. मराठा, धनगर आरक्षण आंदोलन सरकारचे अपयश आहे असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow