धारावीतील अनधिकृत मशिदीवर कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर हल्ला

Sep 23, 2024 - 15:59
 0  17
धारावीतील अनधिकृत मशिदीवर कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर हल्ला

मुंबई : धारावी येथील अनधिकृत प्रार्थनास्थळावर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी शनिवारी सकाळी महानगरपालिका प्रशासनाचा ताफा पोहोचला. मात्र, संबंधित परिसरातील नागरिकांनी कारवाईला विरोध करत पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या गाड्यांची तोडफोड केली.

धारावीतील सदर प्रार्थनास्थळी अनेक वर्षांपासून मोठ्या संख्येने नागरिक जात आहेत. मात्र, हे प्रार्थनास्थळ अनधिकृतपणे बांधण्यात आल्याने पालिका प्रशासनाने त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी महापालिका अधिकारी, कर्मचारी व कामगार पोलिसांच्या ताफ्यासह प्रार्थनास्थळी दाखल झाले. मात्र, पालिकेचा ताफा पाहून नागरिक आक्रमक झाले. तसेच, त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेच्या गाड्यांची तोडफोड केली. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन केले. त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता.
पोलिसांनी जमलेल्या समुदायाची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई थांबवली. महापालिकेने कारवाईबाबत पूर्वीच नोटीस बजावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow