वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या माजी आमदारावर दिड महिना उलटला तरी पोलिसांची कारवाई नाही ; सामान्य नागरिक असता तर गाडी जप्त करून गुन्हा दाखल करत दंड आकारला असता

Sep 23, 2024 - 15:50
 0  13
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या माजी आमदारावर दिड महिना उलटला तरी पोलिसांची कारवाई नाही ; सामान्य नागरिक असता तर गाडी जप्त करून गुन्हा दाखल करत दंड आकारला असता

मीरारोड - मीरा भाईंदर मधील राष्ट्रीय महामार्ग वर तसेच काशिगाव येथील रस्ता व लगतच्या भागात भाजपचे माजी आमदार यांनी ७ ऑगस्ट रोजी क्वॉड बाईक चालवून आपण एन्जॉय केल्याचे सांगत शहरातील नेत्यांचे आभार असा टोला लगावला होता. तर मेहतांनी केंद्र व राज्य सरकारच्या भ्रष्टाचारी कारभाराची पोलखोल केल्याचा प्रतिटोला अनेकांनी लगावतानाच काहींनी वाहतुकीच्या नियमांचे मेहतांनी उल्लंघन केल्याची तक्रार केली . सामान्य नागरिकां वर तात्काळ कारवाई करणाऱ्या पोलिसांनी दिड महिना उलटून देखील मेहतांवर मात्र अजूनही कारवाई न केल्याने पोलिसांवर आरोप होत आहेत . 

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महार्गावर पडलेल्या खड्डयां मध्ये क्वाड बाईक चालवली . तसेच एमएमआरडीए मार्फत  मेट्रोचे काम सुरु असलेल्या शहराचा मुख्य मार्ग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर व लगतच्या खड्डे - चिखलात ते क्वाड बाईक चालवत आरडाओरडा करत व आनंद लुटत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले . 

त्यात स्वतः मेहता यांनीच आपण मजा घ्यायला आलो आहे असे सांगत आंदोलन हा विषयच नाही . मी कोणावर आरोप करायला आणि कोणावर प्रश्न उपस्थित करायला आलो नाही असे म्हटले आहे . दुसरीकडे शहरातील नेत्यांचे आभार मानत ऑक्टोबर नंतर शहराचे रस्ते चकाचक होणार आहेत असा टोला लगावला . अर्थात शहरातील दोन्ही आमदारांना हा टोला लगावल्याचे मानले जाते . कारण मेहतांनी दोन्ही आमदारांच्या मतदारसंघातील रस्त्यांवरचे खड्डे क्वाड बाईक चालवण्याच्या निमित्ताने दाखवले होते . 

राष्ट्रीय महामार्ग हा केंद्र सरकारचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरी मंत्री आहेत . मुख्य रस्ता एमएमआरडीएने बांधला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख आहेत . दोन्ही कडे भाजपा , शिंदेसेना व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने रस्त्यांवरील खड्डे आणि लोकांना होणारा त्रास ह्याला भाजपा महायुतीचे भ्रष्टाचारी सरकार जबाबदार असल्याची पोलखोलच भाजपच्याच मेहतांनी खड्डे दाखवून केली . एकीकडे स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांची व सरकारची पोलखोल करायची आणि दुसरीकडे स्थानिक आमदारांना लक्ष्य करायचे असा प्रकार पाहून जनतेने अश्या लोकां पासून सावधान रहावे. अशी लोकं केवळ स्वतःच्या स्वार्था पुरती असतात असे आरोप होत आहेत . 

गुलामनबी फारुकी ( कार्याध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ) -  वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत महामार्गावर विना हेल्मेट व विरुद्ध दिशेने नंबर प्लेट नसलेली गाडी चालवली . क्वॉड गाडी चालवण्याची परवानगी घेतली नाही .  वाहतुकीला अडथळा आणला . परवानगी नसताना आंदोलन केले .  तात्काळ नरेंद्र मेहतांवर कारवाई करण्याची तक्रार पोलीस आयुक्तांना दिली होती . दिड महिना झाला तरी पोलिसांनी अजूनही कारवाई केली नाही . 
सामान्य नागरिक असता तर पोलिसांनी त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून वाहन जप्त करत दंड ठोठावला असता . इकडे मात्र पोलीस बंदोबस्तातच नियमांचे उल्लंघन केले गेले असताना पोलिसांनी आज पर्यंत गुन्हा दाखल केला नाही , गाडी जप्त केली नाही व दंड वसूल केला नाही.  

कृष्णा गुप्ता ( अध्यक्ष, सत्यकाम फाउंडेशन ) -  राष्ट्रीय महामार्ग आणि शहराच्या मुख्य रस्त्यावर मेहतांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन पोलीस बंदोबस्तात करणे गंभीर आहे . बंदोबस्त साठी दिलेल्या पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात सहभाग दाखवला आहे . हि अतिशय गंभीर बाब असून सामान्य नागरिकांवर जशी तात्काळ कारवाई केली जाते तशी कारवाई पोलिसांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांवर केली पाहिजे होती . परंतु काही पोलिसांसाठी कदाचित मेहता हे अतिशय आदर्श चारित्र्यवान सत्पुरुष असावेत म्हणून त्यांच्यावर पोलीस नेहमी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असावेत .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow