छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण:मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील याला 13 सप्टेंबर पर्यंत कोठडी
मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना न्यायालयाने आता 13 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वास्तविक आपटे हा पाच दिवसांपासून तर चेतन पाटील हा दहा दिवसांपासून पोलिस कोठडीत होता. त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. वास्तविक चेतन पाटील याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, आता नवीन कायद्यानुसार चेतन पाटील याची चौकशी करायची असेल तेव्हा, न्यायालयाच्या आदेशाने पोलिस त्याला ताब्यात घेऊ शकतात. या प्रकरावरुन राज्यभरातू संताप व्यक्त केल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा सरकारच्या वतीने देण्यात आला होता. वास्तविक या प्रकरणातील मुख आरोपी जयदीप आपटे हा विसंगत माहिती देत असून त्यामुळे पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने तीन दिवसांची म्हणजेच 13 तारखेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. केवळ दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला 10 दिवसानंतर अटक करण्यात आली होती. कल्याणच्या घरी कुटुंबीयांना भेटण्यास आला असता पोलिसांनी त्याला अटक केली होती. सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळला. या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. भारतीय नौदलाने शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता, याचे कंत्राट ठाणे येथील जयदीप आपटे या तरुणाला देण्यात आले होते. मात्र जयदीप आपटे याला केवळ दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव होता, तरी देखील याला कंत्राट का दिले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले पोलिसांनी जयदीप आपटे तसेच स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, मी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही. मी फक्त या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन करून दिले होते. पुतळा उभारणीचे काम ठाण्यातील कंपनीने केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जयदीप आपटे कोण आहे? जयदीप आपटे हा कल्याण येथील 25 वर्षीय तरुण आहे. याच तरुणाने राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटांचा ब्रॉंझचा पुतळा उभारला होता. मात्र जयदीप आपटे याला फक्त दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव आहे. 28 फुट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी किमान 3 वर्षांचा काळ लागतो. पण हा पुतळा जून 2023 मध्ये बनविण्यास सुरुवात केली आणि डिसेंबर 2023 पर्यंत म्हणजे फक्त 7 महिन्यात काम पूर्ण झाले, अशी माहिती जयदीप आपटे याने एका मुलाखतीत दिली होती.

What's Your Reaction?






