पॅरालिम्पिक vs ऑलिम्पिक:भारताने पॅरालिम्पिकमध्ये जिंकली 29 पदके... ऑलिम्पिकपेक्षा 5 पट जास्त
रविवारी पॅरिस येथे समारोप झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने सोनेरी इतिहास रचला. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आपले अभियान एकूण २९ पदकांसह (७ सुवर्ण, ९ रौप्य व १३ कांस्य) पूर्ण केले. ही पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. देशाला गेल्या वेळेसपेक्षा १० पदके जास्त मिळाली. भारताने प्रथमच टॉप-२० देशांत स्थान मिळवले. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एकूण १९ पदकांसह भारत २४व्या स्थानी होता. पॅरालिम्पिकमध्ये ८४ खेळाडूंनी २९ पदके आणली, तर ऑलिम्पिकमध्ये ११७ खेळाडू केवळ ६ पदके जिंकलू शकले. यात एकही सुवर्ण नव्हते. नवे प्रशिक्षक, मानसशास्त्रीय प्रशिक्षणामुळे फायदा - दीपा मलिक माजी अध्यक्षा, भारतीय पॅरालिम्पिक समिती रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये भारताला केवळ ३ पदके मिळाली होती. याचदरम्यान पॅरालिम्पिकमध्ये भारताने २ सुवर्णासह ४ पदके जिंकली. तेव्हापासून सर्वांचे लक्ष या खेळांकडे गेले. २०१६ मध्ये प्रथमच पंतप्रधानांनी पॅरालिम्पिक खेळाडूंची भेट घेतली. तोपर्यंत देशात दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सुगम्य अभियानही सुरू झाले होते. लोक दिव्यांगांना समान दृष्टीने पाहत होते आणि विशेष रँप व स्वच्छतागृहांच्या निर्मितीमुळे पॅरा-खेळाडूंची स्टेडियमपर्यंत पोहोच वाढत चालली होती. २०२० मध्ये पॅरालिम्पिक समिती अध्यक्षा झाल्यानंतर या खेळांना मुख्य प्रवाहात आणण्याचा, खेळाडूंचे आकडे इंटरनेवर उपलब्ध करण्याचा माझा उद्देश होता. आम्ही पॅरा-खेळाडूंना सोशल मीडियावर ब्लू टिकही मिळवून दिले, जेणेकरून लोकांनी त्यांना ओळखावे. पॅरा खेळांची ज्युनियर आणि सबज्युनियर चॅम्पियनशिप पुन्हा सुरू केली, जेणेकरून नवी कौशल्ये ओळखता येतील. नव्या प्रशिक्षकांना प्रशिक्षित केले. देशात जागतिक पातळीच्या पॅरा-स्पर्धा भरवल्या. खेळाडूंच्या मानसशास्त्रीय प्रशिक्षणावरही भर दिला. अनेक खेळाडू आपले माता-पिता किंवा भावांविना परदेशात जाऊ इच्छित नव्हते. तथापि, सरकारकडून फक्त एका सहकाऱ्याचाच निधी मिळतो. आम्ही फेडरेशनच्या खर्चावर या खेळाडूंसोबत जितकी गरज आहे तितकेच सहकारी पाठवले. सुदैवाने सरकार आणि मंत्रालयही पॅरा-खेळाडूंना समान सहकार्य करत आहे. देशात पॅरा-खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा वाढल्या आणि आता तर खेलो इंडिया पॅरा गेम्सही सुरू झाले आहेत. याचाच परिणाम पदकांमध्ये दिसत आहे. ..ऑलिम्पिकमध्ये यामुळे मागे- मानसशास्त्रीय प्रशिक्षणाची उणीव २० वर्षांपासूनचे आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मानसशास्त्रीय प्रशिक्षक डॉ. स्वरूप सवानूर म्हणतात, ६ ऑलिम्पिक खेळात भारत चौथ्या स्थानी राहिला. भारतात खेळाडू व प्रशिक्षकांना वाटते की, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये केलेली कामगिरीच ऑलिम्पिकमध्ये जिंकवू शकते. मात्र, असे नाही. अनेक खेळाडू म्हणतात, स्पर्धा जवळ आल्यावर दबाव जाणवतो. झोप कमी येते. त्यामुळे मानसशास्त्रीय प्रशिक्षण गरजेचे आहे. त्याचीच इथे उणीव आहे.

What's Your Reaction?






