आयुक्त संजय काटकरांच्या काळातही दुरुस्ती परवानगीच्या आड अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट

बांधकाम अस्तित्वात नसताना सुद्धा दुरुस्ती परवानग्या
भाईंदर - मीरा भाईंदर शहरात अनधिकृत बांधकामे मोठया प्रमाणात सूरू आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी एक नविन फंडा सूरू केला आहे. महापालिकेचा अजब कारभार सुरू आहे. बांधकामे अस्तित्वात नसताना देखील दुरुस्त्या परवानग्या दिल्या जात आहेत. दुरूस्ती परवानगीच्या आड अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. या दुरुस्ती परवानगीच्या आड सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
मीरा भाईंदर शहर हे गेल्या काही वर्षात अनधिकृत बांधकामांचे माहेरघर झाले आहे. प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक ६ मध्ये बार, गेस्ट हाउस व झोपडपट्ट्याचे मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या झोपडपट्ट्यामध्ये परप्रांतीय नागरीक मोठ्या संख्येने राहत आहेत. या झोपडपट्ट्या मध्ये अनेक गुन्हेगारी प्रवुत्तीचे लोक राहत असल्याचे बोलले जात असुन या झोपडपट्ट्यामध्ये बेकायदेशीर कृत्य केले जात आहेत. या अनधिकृत बांधकामावर महापालिका अधिकाऱ्याकडून कारवाई न करता त्याला आर्थिक स्वार्थापोटी पाठीशी घातले जात आहे. आता महापालिका अधिकाऱ्यांनी या अनधिकृत बांधकामांना दुरूस्ती परवानगी देण्याचा नविन फंडा सूरू केला आहे. या दुरूस्ती परवानगीच्या आड शहरात सर्रासपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. प्रभाग ६ मध्ये तत्कालीन प्रभाग अधिकारी सचिन बच्छाव यांनी तर अनेक बार व गेस्ट हाऊसला नियमांचे उल्लंघन करत दुरुस्ती परवानगी देऊन अनधिकृत बांधकामांला संरक्षण दिले होते. त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याऐवजी महापालिका अधिकाऱ्यांनी प्रभाग ४ मधील मौजे नवघर, स.क्र.४६८ (जुना), १४४ (नविन) या जागेवरील महेश इंडस्ट्रीयल इस्टेट या विद्यमान औद्योगिक वसाहतीमधील गाळा क्र.२०६ याचे बांधकाम अस्तित्वात नसताना त्याला दुरुस्ती परवानगी दिली आहे.
या दुरूस्ती परवानगीच्या आड अनधिकृत बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी तळ अधिक एक मजल्याचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. या अनधिकृत बांधकाम करण्यास अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी दुरूस्ती परवानगी दिली आहे. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा सूरू आहे. तसेच सिल्वर पार्क सिग्नल येथे अनधिकृत बांधकाम केलेल्या तळ अधिक दोन मजल्याच्या इमारतीवर २०१२ मध्ये कारवाई करण्यात आली होती. त्या अनधिकृत बांधकामाला देखिल दुरुस्ती परवानगी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मीरा भाईंदर शहरात या अनधिकृत बांधकामावर महापालिका कारवाई करण्यास टाळाटाळ करत असुन उलट अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने दिलेल्या दुरुस्त्या परवानग्याची व यात होत असलेल्या भ्रष्टाचाराची आयुक्त यांनी चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थानी केली आहे.
What's Your Reaction?






