अंतर्गत सर्व्हेने भाजपमध्ये भीतीचे वातावरण:महायुतीतल्या मित्र पक्षांना विधानसभेच्या 100 च्या आत जागा मिळणार, रोहित पवारांचा दावा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केलेल्या एका अंतर्गत सर्व्हेत महायुतीला 100 च्या आत जागा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे भाजपच्या गोटात भीतीचे वातावरण पसरले असून, यामुळेच केंद्रीय पातळीवरून विविध हालचाली सुरू झाल्या आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार मंगळवारी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले की, एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला आहे. त्यामध्ये अजितदादांच्या गटाला 7-11 जागा, शिंदे साहेबांच्या गटाला 17-22 जागा आणि भाजपला 62-67 जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आहे. यामुळे भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरली असून, त्यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या आहेत. त्यानुसार, अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर 6 ते 7 जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिली आहे. कर्जत जामखेड संदर्भात तर "कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको", असे सांगितल्याने कर्जत जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मी ही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज आहे. या महायुद्धात कर्जत जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील असा विश्वास आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. भाजपचा 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह दुसरीकडे, महायुतीमधील 3 घटकपक्ष यावेळी प्रथमच विधानसभेच्या निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जात आहेत. यामुळे सत्ताधारी पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. जागा कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त अशी विचित्र स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यातून तिढा काढण्यासाठी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी किमान 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी मागणी अमित शहांकडे केल्याची माहिती आहे. द हिंदू या इंग्रजी दैनिकाने असा दावा केला आहे.

What's Your Reaction?






