घाटगेंनी फडणवीसांचा विश्वासघात केला:पण मी शरद पवारांच्या परवानगीने अजितदादांसोबत आलो, मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काही लोकांनी विश्वासघात केल्याची टीका राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्यावर निशाणा साधताना केली. हे सांगताना मुश्रीफ यांनी आपण स्वतः शरद पवारांच्या परवानगीने अजित पवारांसोबत आल्याचाही दावा केला. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समरजितसिंह घाटगे यांनी गत आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांना कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ यांच्याविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी घाटगे यांच्यावर निशाणा साधला. हसन मुश्रीफ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा काही लोकांनी विश्वासघात केला. एखादा माणूस एखाद्याचा गैरफायदा घेऊन विश्वासघात करतो. कागलच्या जनतेने मला 6 वेळा निवडून दिले म्हणून आता हवा बदलली असे काहींना वाटत असेल. पण यंदाच्या निवडणुकीत अशीच हवा बघत राहिलात तर तुमचे वाटोळेच होईल. पवारांचा विश्वासघात केला नाही -मुश्रीफ हसन मुश्रीफ यांनी यावेळी आपण शरद पवार यांचा कोणताही विश्वासघात केला नसल्याचा दावाही केला. ते म्हणाले, मी शरद पवार यांचा कोणताही विश्वासघात केला नाही. मी शरद पवार यांना सांगून आलो. त्यांनी स्वतः मला जाण्याची परवानगी दिली. हसन मुश्रीफ यासंबंधीचा एक किस्सा सांगत म्हणाले की, शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आम्ही खासगी विमानाने मुंबईत आलो. मुंबईत खासगी विमानतळ हे वेगळे आहे. तिकडे आम्ही चौघे बसलो होतो. त्यावेळी शरद पवार तिकडे आले. आम्ही सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला कुठे आलात असा प्रश्न केला. मी उत्तर दिल्यानंतर शरद पवार म्हणाले की, हो तुम्ही तर जनतेची परवानगी घेऊन आलात ना. पवार माझ्याच मागे का लागले कळत नाही समरजीतसिंह घाटगे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशानंतर हसन मुश्रीफ यांनी शरद पवार माझ्या मागे का लागले हे कळत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसमधून 40 ते 50 आमदार बाहेर पडले. पण शरद पवार माझ्याच मागे का लागले हे कळायला मार्ग नाही. यानिमित्ताने मी एकच सांगेन की, पवार साहेबांशी माझे कोणतेही वैर नाही, पण समरजीत यांची आता खैर नाही. ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक अशी आहे.

What's Your Reaction?






