सहकारी संस्था कर्जवसुली कार्यशाळा:महसूल, सहकार अन् पोलिसांच्या संयुक्त कारवाईने होईल परिणामकारक वसुली - डॉ. मुकेश बारहाते
विशेष वसुली अधिकारी यांनी महसुल, पोलीस आणि सहकार खात्याच्या मदतीने संयुक्त कारवाई केल्यास परिणामकारक कर्ज वसुली होवुन ठेवीदारांच्या रकमा परत करणे सोयीचे होईल, असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी केले. देवगिरी नागरी सहकारी बँक कर्मचारी प्रशिक्षण केंद्र क्रांती चौक येथे विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने सहकारी संस्थांमधील वसुली दाखले व कार्यपद्धती याबाबत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस माजी वसुली अधिकारी अनंत कातकडे व मुख्य कार्यकारी अधिकारी, देवगिरी नागरी सहकारी बँक प्रविण नांदेडकर यांनी मार्गदर्शन केले. उप/सहायक निबंधक, आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था, यशस्वीनी महिला स्वयंसहाय्यता गटाची सहकारी पतसंस्था, आदर्श महिला नागरी सहकारी बँक, अजिंठा अर्बन को-ऑप बँक इत्यादी यांचे प्रशासक, प्राधिकृत अधिकारी व वसुली अधिकारी यांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखल्याबाबत तसेच कलम १५६ व नियम १०७ ची कार्यपद्धती बाबत एक दिवसीय प्रशिक्षण आणि कार्यशाळा घेण्यात आली. कर्ज वसुली करतांना अनुसरावयाच्या कायदेशीर पद्धती, कलम १०१ खालील प्राप्त वसुली दाखल्यांनुसार तारण मालमत्तांवर जप्ती बोजा नोंद करणे, तारण मालमत्तांचे तात्काळ मुल्यांकन करुन जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अपसेट प्राईस चा परिपुर्ण प्रस्ताव दाखल करणे, जिल्हाधिकारी यांच्याकडुन तारण मालमत्तांचा ताबा घेणे, कर्जदार व जामीनदार यांच्या वेतनातुन त्यांचे कार्यालय प्रमुख यांचेमार्फत कर्ज हप्ता कपात करुन घेणे, कर्जदार व जामीनदार यांच्याकडे नियमित कर्ज वसुलीसाठी पाठपुरावा करुन कर्ज वसुली करण्याबाबतच्या कायदेशीर प्रक्रियांबाबत तसेच कर्ज वसुली करतांना येणाऱ्या विविध अडचणी, शंका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. मुकेश बारहाते यांनी उपस्थितांना सक्तीने वसुली करुन संस्था/बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्या,असे निर्देश दिले. थकीत कर्जप्रकरणांबाबत कलम १०१ खालील दाखला तात्काळ प्राप्त होण्यासाठी परिपुर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह वेळीच सादर करावा. प्रत्येक सुनावणीला विशेष वसुली अधिकारी यांनी आवश्यक ते कागदपत्रांसह उपस्थित रहावे. कलम १०१ खालील दाखल अर्जांवर त्वरीत कार्यवाही करुन निकाली काढावे,असे निर्देश त्यांनी सर्व तालुका निबंधकांना दिले.

What's Your Reaction?






